Akshaya Tritiya 2025 Date: हिंदू धर्मामध्ये अक्षय्य तृतीयेस अतिशय महत्त्व आहे. अतिशय शुभ आणि पुण्यदायी मानला जाणारा हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेले दानधर्म आणि पूजापठणामुळे कित्येक लाभ मिळतात. विशेषतः लक्ष्मीमातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. यंदा अक्षय्य तृतीया कधी आहे, लक्ष्मीमातेची पूजा कशी करावी आणि कोणत्या मुहूर्तावर करावी? जाणून घेऊया सविस्तर माहिती…
अक्षय्य तृतीया कधी आहे? (Akshaya Tritiya Date)
हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 29 एप्रिलला संध्याकाळी 5.31 वाजता सुरू होणार असून 30 एप्रिलला दुपारी 2.12 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीया 30 एप्रिलला साजरी करण्यात येईल.
अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त? (Akshaya Tritiya Puja Shubh Muhurat)
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त सकाळी 5.41 वाजेपासून ते दुपारी 12.18 वाजेपर्यंत असणार आहे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीमातेची कशी पूजा करावी? (Akshaya Tritiya Puja Vidhi)
- मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विष्णू देवता आणि लक्ष्मीमातेची संयुक्त स्वरुपात पूजा केल्यास जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारे धनधान्याची कमतरता निर्माण होणार नाही.
- पहाटे उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
- देवाऱ्हा स्वच्छ करून घरामध्ये गंगाजल शिंपडावे.
- देवघरात लक्ष्मी – नारायणाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी.
- पूजेला शुभारंभ करण्यापूर्वी मनामध्ये संकल्प करावा. लक्ष्मीमातेची मनोभावे पूजा केल्यास त्यांचा आशीर्वाद मिळेल.
- यानंतर लक्ष्मीमातेच्या मूर्तीसमोर दिवा लावावा.
- विष्णू देवतेच्या मूर्तीवर चंदन आणि लक्ष्मीमातेच्या मूर्तीवर हळद-कुंकू वाहावे.
- भगवान नारायणाला पिवळे फुल आणि लक्ष्मीमातेला कमळाचे फुल अर्पण करावे.
- लक्ष्मीनारायण देवतेला गोड पदार्थाचाही नैवेद्य अर्पण करावा.
- पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा नक्की समावेश करावा, कारण तुळस विष्णू देवतेला प्रिय आहे.
- पूजेच्या थाळीमध्ये सोने-चांदीचे नाणे, कुंबेर यंत्र, श्रीयंत्र देखील ठेवू शकता. यामुळे लक्ष्मीमातेची कृपादृष्टी कायम राहण्यास मदत मिळते.
- पूजेनंतर लक्ष्मीमाता आणि विष्णूदेवतेची आरती करावी.
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करण्याचे खूप महत्त्व आहे.
- अक्षय्य तृतीयेची पूजा केल्यानंतर गरजूंना अन्न, वस्त्र इत्यादी गोष्टींचे दान करू शकता. असे केल्यास पुण्य तसेच लक्ष्मीमातेची कृपा मिळते.